उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात सुरु असलेले कोरोना सेंटर बंद करुन त्या ठिकाणी इतर रुग्णावर उपचार केंद्र सुरु करावे, अशी मागणी पंचायत सामितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी केली आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पंचायत समितीचे उपसाभापती बाळासाहेब तोरणे यांनी पुढे म्हटले आहे की, उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केल्यामुळे इतर आजारावर उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. विशेष करुन गर्भवती महीलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव दुसऱ्या दवाखान्यात जावे लागते. पूर्वी ग्रामिण रुग्णालयात महीलांना प्रसुती पूर्व व प्रसुती नंतर होणारे उपचार तपासण्या तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी गर्दी होत असे लहान मुलांचे लसीकरण, सर्पदंश, श्वानदंश उपचार या करीता देखील मोठी गर्दी होत असे;परंतु, कोविड सेंटर सुरु केल्यापासुन आजारी रुग्ण दवाखान्यात फिरकत नाही. या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी व अँडमिट करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. डाँक्टर व पुरेसा कर्मचारी वर्गही उपलब्ध नाही. या उलट संतलुक हाँस्पीटल येथे १०० खाटांचे कोरोना रुग्णालय असुन त्या ठिकाणी बोटावर मोजण्या ईतकेच रुग्ण उपचार घेत आहे. अजित दादा पाँलिटेक्निक काँलेज येथेही १०० खाटांचे कोविड सेंटर सुरु असुन तेथेही उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. या उलट चित्र खाजगी कोविड सेंटरमधे पहावयास मिळत आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहे त्यामुळे उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात सुरु असलेले कोविड सेंटर बंद करुन ते रुग्ण संतलुक हाँस्पीटल व अजितदादा पाँलीटेक्निक काँलेज येथे हलवावे अशी मागणीही उपसभापती तोरणे यांनी केली आहे.