साईकिरण टाइम्स | 4 ऑक्टोबर 2020
दिवंगत कामगार नेते कॉ. भि. र. बावके यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे वतीने श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील शेतमजुरांच्या गरजू विद्यार्थिनी व अपंगाना सायकल वाटपाचा कार्यक्रम युनियनच्या कार्यालयात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधीज्ञ के. वाय. मोदगेकर, युनियनचे सरचिटणीस कॉ. बाळासाहेब सुरुडे, अध्यक्ष कॉ. गुजाबा लकडे, कॉ.तुकाराम भुसारी, प्रा. बाळासाहेब बावके, अँड. गौरव मोदगेकर आदि उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँड. के. वाय. मोदगेकर यांनी बोलताना सांगितले कि, कॉ. भि.र. बावके यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या संघर्षातून कामगारांच्या हितासाठी लढे उभारले. रस्त्यावरच्या लढ्याबरोबरच कायदेशीर लढेही त्यांनी दीर्घकाळ देवून कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगार कायद्याचे ते दांडगे अभ्यासक होते. कामगार क्षेत्रात नावाजलेला वकील होण्याच्या माझ्या वाटचालीत कॉ. बावके यांचा मोलाचा वाटा आहे. वर्तमान काळात कामगारांसमोरील आव्हानं पेलण्यासाठी कॉ. बावके यांचं कसब आपल्याला अंगी बाणवावं लागनार असल्याचे मत अँड. मोदगेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. बाळासाहेब सुरुडे यांनी कॉ. भि.र. बावके यांच्या चळवळीतील संघर्षमय वाटचालीची मांडणी विषद केली. केंद्र सरकारने आणलेल्या कामगार व शेतकरी विरोधी कायद्यामुळे श्रमिक जनतेसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली असून, अशावेळी कॉ. बावके यांची विशेष आठवण येते. पुस्तकी विचार मांडणं तुलनेत सोपं आहे पण ते व्यवहारात कसं उतरवायचं यात कॉ. बावके यांचं कसब वाखाणण्याजोगं होतं. म्हणून पुढील काळात कॉ. बावके यांच्या विचारांवरच पक्ष व युनियनचे कार्य जोमाने सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. बाळासाहेब बावके, कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरुडे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी केले तर आभार युनियनचे अध्यक्ष कॉ. गुजाबा लकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. गुजाबा लकडे, कॉ.तुकाराम भुसारी, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. मदिना शेख, कॉ. श्रीकृष्ण बडाख, चिमा शेंडे,दिगंबर कोह्कडे, दादा पटारे, उत्तम माळी, प्रकाश भांड, राहुल दाभाडे, बाळासाहेब चव्हाण, भीमराज पठारे, अश्रू बर्डे, मिठूभाई शेख आदींनी प्रयत्न केले.