साईकिरण टाइम्स | 12 ऑक्टोबर 2020
सात्रळ (बाबासाहेब वाघचौरे) शनिवारी मध्यरात्री ( दि.11) शेळीची शिकार करताना अंधाराचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबटया विहिरीत पडला. विहिरीतील पाइपचा आधार घेत रातभर बिबट्या तेथेच राहिला पण शेळी मृतावस्थेत आढळली. रविवारी सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. ही घटना नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे घडली.
कैलास जगन्नाथ प्रधान यांच्या विहिरीनजिक असलेल्या तारेच्या कुंपणातुन शेळीची शिकार करताना, अंधाराचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबट्या विहिरीत पडला. बिबट्याला कुठल्याही प्रकारची इजा न पोहचता विहिरीतील पाईपच्या आधारे बचावला. मात्र, शेळी मृत अवस्थेत विहिरीत आढळली. सकाळी डरकाळी फोडण्याचा आवाज येत होता. विहिरीत बिबट्या दिसला. गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला सकाळी वन विभागाचे कर्मचार घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबटयाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.