साईकिरण टाइम्स | 5 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीत लाखो रुपये ठेकेदाराच्या घशात घालून नुकत्याच केलेल्या गोंधवनी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून, दर्जाहीन काम होण्यास जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या संबंधित दोषी, भ्रष्ट अधिकाराऱ्यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार राजेश बोरुडे यांनी केली आहे.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. पालिका हद्दीतील अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या गोंधवनी रस्त्याचे काही दिवसांपूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले. हे काम करताना ठेकेदाराने रस्त्याच्या कामाची माहिती दर्शवणारा 'माहितदर्शक फलक' लावला नाही. रस्त्याला साईड पट्ट्या केलेल्या नाहीत. डांबर कमी प्रमणात वापरले आहे. रस्त्याच्या कामात अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्त्य वापरल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. पालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचे हात 'ओले' झाल्यामुळे रस्त्याचे निकृष्ट काम झाले व त्यामुळेच प्रशासनाने ठेकेदारावर कुठलाही वचक ठेवला नसल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे. पालिका पदाधिकारीही मुग गिळून गप्प बसल्याने त्यांचेही हात ओले झाले की काय? असा सवाल बोरुडे यांनी उपस्थित केला आहे.
गोंधवनी रस्त्यावर कॅनॉल पुलालगत, भारत पेट्रोल पंपासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीसमोर तसेच साठवण तलावाच्या भिंतीलगतचा परिसर, आमदार भाऊसाहेब कांबळे सभागृह व जलशुद्धीकरण केंद्रासमोरील भागात जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्ता खचला आहे. जलशुद्धीकरण केंद्रासमोरील काही भागात रस्त्याचे अर्धवट काम केले आहे. काही भाग मोकळा सोडला आहे. काही ठिकाणी भूमिगत गटारीचे चेंबर वरती तर रस्ता खाली अशी अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला कोणतेही काम देऊ नये व काळ्या यादीत टाकावे. ठेकेदारसह संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे राजेश बोरुडे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.