साईकिरण टाइम्स | 9 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर नगरपालिकेत विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी केल्याच्या तुघलकी निर्णयाचा समाजवादी पार्टीने तीव्र निषेध केला असून, कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर हजर करुन घ्या; अन्यथा समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना दिला आहे.
समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, सोहेल बागावान, अरबाज कुरैशी, दानिश शाह, मुनीर शेख, आसिफ तांबोली, साईनाथ खंडागळे ,मुबसशिर पठान,ज़करिया सय्यद आदींनी यासंदर्भात शुक्रवारी ( दि.9) पालिकेचे मुख्याधिकारी ढेरे यांना निवेदन दिले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा, अतिक्रमण, वसुली, बांधकाम, वीज या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कामगारांनी अतिशय तुटपुंज्या वेतनावर प्रामाणिक सेवा दिली आहे. कोरोना- 19 च्या काळात दिवस - रात्र त्यांच्याकडूनच पालिका प्रशासनाने काम करून घेतले, कामगारानीही ते प्रामाणिकपणे केले . त्याची दखल पालिका प्रशासनाने घेऊन त्यांचे वेतन वाढविणे तर दूरच परंतू एकतर्फी निर्णय घेत कामगारांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकले, त्यामुळे सर्वच कामगारांन पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या तुघलकी निर्णयाचा समावादी पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करुन कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर तातडीने हजर करुन घ्यावे; अन्यथा नाईलाजाने आपल्या दालनात समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते घेराव घालून ठिय्या आंदोलन करतील, असा सज्जड इशारा दिला आहे.