साईकिरण टाइम्स | 24 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर बळवंत भुवन इमारतीसमोर अनधिकृतपणे अतिक्रमण करून टाकलेल्या दोन पत्र्याच्या टपऱ्या शुक्रवारी (दि.23) दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात काढण्यात आल्या. यासंदर्भात छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांनी (दि.13) रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याबाबत 'साईकिरण टाइम्स'ने (दि.21) सचित्र वृत्त प्रसिद्ध करून नगरपालिका प्रशासनाला 'स्ट्रोक' दिल्यांनतर प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली.
मागील काही दिवसांपूर्वी, शहरातील मुख्य रस्त्यावर बळवंत भुवन या इमारतीसमोर अतिक्रमण करून दोन पत्र्याच्या टाकण्यात आल्या होत्या. याची कोल्हे यांनी मुख्यधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही पालिका प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत होते. त्यामुळे, कोल्हे यांनी नगरपरिषदेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिल्यानंतर झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग आली. याबाबत 'साईकिरण टाइम्स'ने, 'श्रीरामपूरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून टपऱ्या टाकल्या;उपोषणाचा इशारा' या मथळ्याखाली दि.21रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर 'साईकिरण टाइम्स'चे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.