साईकिरण टाइम्स | 31 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर तालुक्यातील अनाधिकृत, विनापरवाना व अतिरिक्त कोळशाचा वापर करणाऱ्या बेकायदेशीर वीटभट्टीचालकांवर दंडात्मक कारवाई करून, वीटभट्ट्या बंद करण्याबाबत तहसीलदारांकडे तक्रार करून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे, सोमवारी (दि. 2 नोव्हेंबर) प्रांत कार्यालसमोर उपोषणास बसण्याचा इशारा, उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
यासंदर्भात छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांनी महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, दि.३१ ऑगस्ट रोजी तहसीलदारांकडे श्रीरामपूर तालुक्यातील अनाधिकृत विनापरवाना तसेच अतिरिक्त कोळशाचा वापर करणाऱ्या, बिनशेती व व्यवसायिक जागा नसणाऱ्या वीटभट्टी मालकांवर दंडात्मक कारवाई करून बेकायदेशीर वीटभट्ट्या बंद करण्याबाबत तक्रार करूनही तहसीलदारांनी त्याची दाखल घेतली नाही. तक्रारीवर कोणताही पत्रव्यवहार केला नाही. माहिती अधिकारातही अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली. माहिती दडवून ठेवण्याचे नेमके कारण काय? असा सवालही कोल्हे यांनी केला आहे. प्रशासन वीटभट्ट्यांची तपासणी का करत नाही? शासनाचा कर बुडवणाऱ्या बेकायदेशीर, विनापरवाना असलेल्या वीटभट्टी मालकांना पाठीशी का घालत आहे, असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कोल्हे यांनी केली आहे.