साईकिरण टाइम्स | 30 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील मागील वर्षी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सदर नुकसानीचे पंचनामेही करण्यात आलेले होते. परंतू अद्याप संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली नव्हती. यासंदर्भात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार प्रशांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शेतकर्यांना सदरची नुकसान भरपाई दीपावलीपुर्वी देण्यात येईल, असे आश्वासन श्री.पाटील यांनी दिले असल्याची माहिती युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे व लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार श्री.पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, सन 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला होता. पुराचे पाण्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे महसुल विभागाने गोदावरी नदीकाठावरील सुमारे 7 ते 8 गावातील नुकसानग्रस्त शेतकर्यांचे नुकसानीचे पंचनामे त्यावेळी केले होते. परंतू अद्यापपर्यंतही संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचे म्हटले आहे.
याबाबत युवक नेते श्री.सिद्धार्थ मुरकुटे व अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी सदरच्या नुकसान भरपाईची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली असून तिचे दीपावलीपुर्वी वाटप करावे, अशी मागणी यावेळी केली. त्यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना तहसीलदार श्री.पाटील यांनी सांगितले की, ‘सदर नुकसान भरपाईची रक्कम श्रीरामपूर तहसील कार्यालयाकडे आलेली असून ती संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा केली जाईल’ असे सांगितले. या शिष्टमंडळात लोकसेवा विकास आघाडीचे प्रतोद अभिषेक खंडागळे, आदिनाथ झुराळे, युवक अध्यक्ष गणेश भाकरे, प्रमोद करंडे आदींचा सहभाग होता.