साईकिरण टाइम्स | 21 ऑक्टोबर 2020
वडाळा महादेव (राजेंद्र देसाई ) श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रस्त्यालगत असणारे श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रम चार दशकापासून भाविकांचे श्रद्धास्थान निर्माण झाले आहे. हे जागृत देवस्थान असुन 'श्री माहूर निवासिनी रेणुका देवी' नवसाला पावणारी आहे, अशी भक्तांची भावना आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असतो; परंतु, यंदा कोरोना महामारीमुळे नैमित्तिक धार्मिकविधी शासकीय नियमाप्रमाणे करण्यात येत आहेत. येथील परिसर स्वच्छ व सुंदर असून विविध वृक्षवेलींनी सजलेला आहे. याठिकाणी वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
चार दशकापासून या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरा करण्यात येत असतात. सध्या संपूर्ण देशात करोणा महामारिने थैमान घातले असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत यामध्ये प्रशासनाकडून धार्मिक ठिकाणी विविध निर्बंध करण्यात आले आहे. शारदीय नवरात्र उत्सवास येथील श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये भाविकांच्या दृष्टीने विविध उपाययोजना करून दर्शन सुलभ होण्यासाठी सभामंडपामध्ये भाविकांना दुरूनच दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था मंदिर व्यवस्थापन समितीने शासकीय आदेशाचे पालन करत केली आहे.
हभप देवीभक्त महंत रेवननाथ महाराज यांच्या अथक प्रयत्नातून याठिकाणी श्री रेणुका देवी माता यांचे भव्यदिव्य मंदिर निर्माण झाले आहे. श्री रेणुका देवी यांचे स्थान तळघरामध्ये करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी भुयारी मार्गाने दर्शनासाठी सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. सभामंडपामध्ये श्री गणेश, श्री रेणुकादेवी, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा यांची मूर्ती असुन भाविकांना सर्व देवतांचे एका ठिकाणी दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. सभामंडपामध्ये यज्ञकुंड तयार करण्यात आला आहे. याठिकाणी होम हवन करण्यात येत असते. प्रवेशद्वारासमोरच मोठी दीपमाळ आहे. धार्मिक कार्यक्रम प्रसंगी दीपोत्सव करण्यात येत असतो. आश्रमाच्या माध्यमातून सतत वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. गुरुपोर्णिमा उत्सव, शारदीय नवरात्र उत्सव, दत्त जयंती उत्सव, तसेच विविध राज्यातून येणाऱ्या व जिल्हा तसेच तालुक्यातून श्रीक्षेत्र पैठण तसेच श्री क्षेत्र शिर्डी येथे जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचे याठिकाणी स्वागत करून भाविकांची व्यवस्था तसेच अन्नदान करण्यात येत असते. हभप देवीभक्त महंत रेवननाथ महाराज यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. अँड आदिनाथ जोशी प्रयत्नशील असतात. तर रेणुका देवी यांचे दैनंदिन नैमित्तिक पूजन, गोपूजन तसेच विविध देवतांचे पूजन विधि आईसाहेब सौ नलिनी जोशी तसेच सौ आदिती जोशी पार पाडत असतात. श्री रेणुका देवी, शिव आणि शक्तीचे अधिष्ठान समजले जात आहे.