श्रीरामपूर नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना अचानक काढले; कामगार युनियनचा आंदोलनाचा इशारा


साईकिरण टाइम्स | 8 ऑक्टोबर 2020

श्रीरामपूर नगरपालिकेत विविध विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या ६० कामगारांना मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशावरून संबंधित विभागांच्या विभाग प्रमुखांनी अचानक कामावरून काढून टाकले. कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड टाकणाऱ्या या निर्णयाचा अहमदनगर जिल्हा नगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कॉ.जीवन सुरूडे यांनी निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कॉ. सुरूडे यांनी म्हटले आहे की, पालिकेच्या पाणीपुरवठा, अतिक्रमण, वसुली, बांधकाम, वीज या विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कामगारांनी अतिशय तुटपुंज्या वेतनावर प्रामाणिकपणे सेवा दिली. कोरोना महामारीच्या काळात दिवस-रात्र त्यांच्याकडून पालिका प्रशासनाने काम करून घेतले. कामगारांनीही ते प्रामाणिकपणे केले. त्याची दखल पालिका प्रशासनाने घेऊन त्यांचे वेतन वाढवणे तर दूरच; परंतु,  मुख्याधिकारी ढेरे यांनी एकतर्फी निर्णय घेत कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले. त्यामुळे या सर्व कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामगारांना काढण्याचा निर्णय घेताना मुख्याधिकारी यांनी कामगार युनियन तसेच पालिकेच्या लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेतले नाही. अशा एकतर्फी व कामगार विरोधी निर्णयाचा निषेध करत तातडीने या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची मागणी कॉ. सुरूडे यांनी केली आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी यांनी तातडीने निर्णय न घेतल्यास त्यांच्या दालनात त्यांना घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कॉ.सुरूडे यांनी दिला आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post