साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 सप्टेंबर 2020
तब्बल ७ महिन्यांनंतर पार पडलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी प्रभागासह शहरातील महत्त्वपूर्ण कामांच्या मागण्या केल्या. याशिवाय सभेच्या आदल्या दिवशी मुख्याधिकारी, श्रीरामपूर यांना लेखी पत्रही दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरात नगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना रुग्णालय, चाचणी केंद्र सुरू करावे ही मागणी केली. त्यास मुख्याधिकाऱ्यांनी लवकरच आपण देवळाली प्रवरा पालिकेच्या धर्तीवर रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वसित केले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुल नाट्यगृह आरक्षित ठेवण्याचीही मागणी खोरे यांच्यासह नगरसेवकांनी सभागृहात केली.
प्रभाग क्र.१६ मधील शहरात प्रवेश करणारा बेलापूर रस्ता, मुळा प्रवरा रस्ता, थत्ते मैदान रस्ता दुरुस्ती करणे, थत्ते मैदान जॉगिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य दुरुस्ती व फुटलेल्या गटारी दुरुस्त करण्यासह मंजूर रस्त्यांची कामे तात्काळ करण्याची आग्रही मागणी खोरे यांनी केली. घन कचरा ठेकेदार काम व्यवस्थित करणार नसेल तर त्यावर कारवाई करत त्याला संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळ्या यादीत टाकण्याची खोरे म्हणाल्या. नवीन रस्त्यांची कामे करताना नागरी वसाहत नसलेल्या परिसरात रस्त्यांची कामे करू नये त्याऐवजी शहरातील मुख्य रस्त्यांची कामे हाती घ्यावी असे स्नेहल खोरे यांनी सांगत अनेक महत्वाच्या प्रश्नांवर ऑनलाइन सर्वसाधारण सभेत आवाज उठविला.