साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 सप्टेंबर 2020
गेल्या काही दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांशी भागात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचं मोठे नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीचा फटक्याने अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत प्रामुख्यानेसोयाबीन, कपाशी, मका, ऊस,ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह अनेक फळ पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील एस.एस. खटोड अँड सन्स फार्म मालुंजा व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील डाकले फार्मच्या सरप्लस ठरलेल्या जमीनी कसणारे भूमिहीन शेतमजूर व तत्कालीन फार्म वरील कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे वारस हे सन 1985 पासून अनधिकृतपणे जमीन कसत आहे. दरवर्षी पीक पाहणीचे अर्ज केले जातात. परंतु, त्यांची सातबारा सदरी नोंद केली जात नाही. त्यामुळे सदर भूमिहीन शेतमजुरांना शासनाच्या विविध योजनांचे फायदे मिळत नाहीत. त्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन पिके करावे लागतात. अतिवृष्टी दुष्काळ नैसर्गिक आपत्तीमुळे जमीन नापीक झाल्यास त्यांना शासनाची कुठल्याही प्रकारची मदत होत नाही. अशा जमीन कसणाऱ्या शेतमजुरांना शासनाच्या धोरणानुसार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी लाल निशाण पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. बाळासाहेब सुरुडे व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके, सरचिटणीस कॉ. जीवन सुरूडे,कॉ.श्रीकृष्ण बडाख,कॉ.मदिना शेख,कॉ.शरद संसारे,कॉ.उत्तम माळी, कॉ. प्रकाश भांड, कॉ.लखन डांगे,रामा काकडे,आसरू बर्डे,अनिल बोरसे यांनी केली आहे.