श्रीरामपूर तालुक्यातील दिघी ग्रामपंचायतीतील ग्रामसेविका सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांची बदली करावी, त्यांचे वेतन परत घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास 21 सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे, राजाराम शिंदे, वेणुनाथ पवार, जमीर शेख यांनी याबाबत निवेदन दिले असून त्यात म्हंटले आहे की, दिघी ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेविका 5 ते 6 महिन्यांपासून उपस्थित राहत नाहीत अशा तक्रारी आल्या आहेत. ही ग्रामपंचायत नेहमी बंद असते. ग्रामसेविका सतत गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावचा विकास होत नाही. सतत गैरहजर राहूनही वेतन का दिले जाते? असा सवाल कोल्हे यांनी केला आहे. या ग्रामपंचायतीत भैरवनाथनगर ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक काम पाहतात तर वेतन ग्रामसेविका घेतात. भैरवनाथनगर मधील ग्रामसेवकांना दिघी ग्रामपंचायतीत काम करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल उपस्थित केला आहे. एक ग्रामसेवक तीनतीन ग्रामपंचायतीत काम कसा करू शकतो. असेही म्हंटले आहे. भैरवनाथनगर व ब्राम्हणगाव येथील काम सोडून दिघी ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ग्रामसेवकावरही करावी; अन्यथा पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.