साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरच्या कोरोना बाधित रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याने खाजगी रुग्णालये अथवा लोणी, विळद घाट, नगर, पुणे येथे उपचारासाठी जावे लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने त्वरित कोरोना चाचणी केंद्रासह, तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू करणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासन दिरंगाई करत असेल तर 'नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी' प्रांताधिकाऱ्यांना भेट देऊन आंदोलन करण्याचा इशारा, जनविकास आघाडीचे केतन खोरे, बाळासाहेब गोराणे, भाजयुमोचे विशाल यादव, अक्षय वर्पे यांनी दिला आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेने सर्वसामान्य कोरोना बाधित रुग्णांसाठी चाचणी केंद्र व तात्पुरते रुग्णालय सुरू करणे आवश्यक आहे. एकीकडे अहमदनगर महानगरपालिका, संगमनेर, देवळाली प्रवरा नगरपालिका, शिर्डी नगरपंचायतने तेथील नागरिकांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन मात्र वेळकाढूपणा करत असल्याचे खोरे यांनी म्हंटले आहे.
नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधकांनी ७ दिवस शहर बंद करूनही कोरोना साखळी तुटली नाही उलट नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे केतन खोरे, बाळासाहेब गोराणे यांनी म्हटले आहे.
नगरपालिकेच्या मालकीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह, मेनरोडवरील आगाशे हॉल, विविध भागांतील शाळा सध्या रिकाम्या आहेत. त्या जागेत अथवा शहरातील एखाद्या मोठ्या रुग्णालयात नगरपालिकेने चाचणी केंद्र व कोरोना रुग्णालय तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे. श्रीरामपूरात कोरोना सामूहिक संसर्गाकडे पसरत असल्याची भीती भाजयुमोचे विशाल यादव व अक्षय वर्पे यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या जीवावर बेतल्यावर झोपलेले नगरपालिका प्रशासन जागे होणार असेल तर "नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी" प्रांताधिकारी, श्रीरामपूर यांना भेट देऊन प्रशासकीय भवन श्रीरामपूर येथे जनविकास आघाडी व भाजपच्या पदाधिका-यांसह "तिरडी आंदोलन" करणार असल्याचे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, अक्षय वर्पे, बाळासाहेब गोराणे, विशाल यादव यांनी सांगितले आहे.