साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर शहरात येत्या रविवार पासून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बाजारपेठ बंदचे आयोजन केले आहे. यामध्ये छोटे-गरीब, सर्व सामान्य व्यावसायिकांचा कोणीही विचार केला नाही. बाजारपेठ बंद करतांना सर्वसामान्य व गरीब व्यावसायिकांचा विचार व्हावा, तसेच शहरात गोर-गरीब जनतेसाठी नगरपरिषदेने त्वरित कोवीड सेंटर उघडावे,अशी मागणी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्याकडे शुक्रवारी (दि.11) निवेदन देऊन करण्यात आली आहे.
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा आदिक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आधीच देशभरात लॉकडाऊन झाल्यावर सर्व व्यापारी देशोधडीला लागले आहेत. पूर्ण जगावर कोरोनाचे संकट आल्यामुळे देशातही २ ते ३ महिने लॉकडाऊन होते. यात छोटे व्यवसायिक जसे, कुंभार बंधू,चर्मकार, नाव्ही, पान टपरीवाले, राजवाडा मधील व शिखलकरी मोहल्यामध्येे बंधू रिक्षा चालक, काळी पिवळी चालक, फ्रुट व्यवसाय धारक, भाजी पाला विक्रेते, बाजारकरु, यात्रेकरु व श्रीरामपूर शहरातील गॅरेज लाईन, रस्त्यावर फेरीवाले या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एकीकडे करोनाचे संकट, दुसरीकडे आपला प्रपंच चालविण्यासाठी हे संकट डोक्यावर घेऊन फिरणारे गोर-गरीब व्यावसायिकांना श्रीरामपूर नगरपरिषदेने व व्यापारी असोशिएशनने त्वरीत १० दिवसाचे किराणा व इतर समाग्री पुरविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहेया लोकांचे मागील ६ महिन्यात जे भांडवल होते ते संपुष्टात आले असे हजारो व्यापारी रस्त्यावर आले. तरीही पुन्हा एकदा लॉकडाऊन त्यामुळे हे नागरीक त्रस्त झाले आहे. ह्या नागरीकांना कोणी त्रास दिला विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला आहे.
व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची सकती करु नये. आमचा सर्व पक्षीय बैठकीला व व्यापारी असोशिएशनला कोणताही विरोध नाही; परंतु, रस्त्यावर फिरणारे हजारो भिक्षुक बालवयात भिक्षा मागत आहे. ही वेळ यांच्यावर कशामुळे आली आणि यांच्यासाठी श्रीरामपूर नगरपरिषद व व्यापारी असोशिएशनने काय पावले उचलली आहेत असा प्रश्न उवस्थित करण्यात आला आहे.
सामान्य व्यापार्यांना अत्यंत वाईट परिस्थिती असतांना एमएसईबी, पतसंस्था, फायनान्स कंपनी, बँका यांच्या सर्व वसुल्या आजही चालू आहेत. नगरपरिषदेने व श्रीरामपूर व्यापारी असोशिएशनने या लोकांची आर्थिक मदत करावी जेणेकरुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही व ते बंद पाळण्यास तयार होतील. मागील ३ महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामन्य लोकांनी काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केले. परंतु, शहरामध्ये काही गोष्टी लक्षात आल्या की, काही लोकांनी याकाळात ही व्यवसाय केले. याची झळ या नारीकांना लागली आहे. १० रुपयाच्या वस्तु तीनपट किंमतीत विकण्यात आली आहे. या गोष्टीवरही श्रीरामपूर नगरपरिषदेचा व व्यापारी असोशिएशनचे लक्ष असावे असेही म्हंटले आहे.
श्रीरामपूर शहरामध्ये गोर-गरीब जनतेसाठी श्रीरामपूर नगरपरिषदेने कोवीड सेंटर त्वरीत उघडावे. शहरात कॉंग्रेस भवन, खासदार गोविंदराव आदिक सभागृह, म्हाडा, मुळा प्रवरा ऑफीस या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने मोफत कोव्हीड सेंटर चालू करण्यात यावे, अशी मागणी विश्व् हिंदू परिषदेचे रुपेश हरकल, योगेश ओझा, बाळासाहेब हरदास, प्रसाद बिल्दीकर, अर्जुन आदिक यांनी केली आहे.