साईकिरण टाइम्स ब्युरो, 14 सप्टेंबर 2020
वडाळा महादेव ( श्रीरामपूर ) राजेंद्र देसाई| आजी-माजी सैनिकांच्या विविध समस्यांबाबत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना निवेदन देण्यात आले.
देश सेवा करणाऱ्या सैनिकांना न्याय मिळावा या उद्देशाने त्रिदल सैनिक सेवा संघाची स्थापना करण्यात आली. ज्या सैनिकांनी देशासाठी आपले प्राण गमावले अशा सैनिकांसाठी शहीद स्मारक उभे करण्यात यावे, श्रीरामपूर परिसरातील बेलापूर रोडवरील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील कालव्यलगतची जागा शहीद स्मारकासाठी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. श्रीरामपूर शहरातील जुनी तहसील कचेरी पाठीमागील जागा आजी माजी सैनिकांची सोसायटीची निर्मीती करून १९८० पासून एक एकर जागेवर माजी सैनिकांना वाटप करण्यात आले आहे; सध्या काही माजी सैनिकांच्या जागेवर इतर व्यक्तींनी घरे बांधून अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून खाजगी व्यक्तींच्या ताब्यातून जागा माझी सैनिक यांना देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
त्रिदल सैनिक सेवा संघ उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मेजर अनिल लगड, उपाध्यक्ष संग्राम यादव, सचिव बद्रीनाथ देशमुख, आप्पासाहेब काळे, इसाक शेख, श्रीमती छाया मोटे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. लवकरात लवकर प्रशासनाने वरील त्रिदल सैनिक सेवा संघाच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी श्रीरामपूर तालुक्यातील माजी सैनिक यांनी केली आहे.