साईकिरण टाइम्स ब्युरो 13 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षीयांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या जनता कर्फ्यूला आज रविवारी (दि.13) पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी प्रचंड प्रतिसाद देत कोरोनाबद्दल जागृती दाखवून दिली. दरम्यान, शहरामध्ये लॉकडाऊन वरून जे हीन दर्जाचे राजकारण करण्यात आले आहे, त्याबद्दल सामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आज शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवरील दुकाने कडकडीत बंद होती. शहर लॉकडाऊन करण्याच्या प्रश्नावर झालेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी पहिल्या दिवशी शहरवासीयांचा प्रतिसाद मिळेल किंवा नाही याची साशंकता होत; मात्र, शहरातील जनतेने या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद दिला.
फळविक्रेत्यांच्या गाड्या आणि बेकरी वाल्यांची दुकाने सकाळी अपवादात्मक रित्या सुरू होती. मात्र दिवसभर शहरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. जनतेने स्वतःच्या काळजी साठी स्वतः निर्बंध लादून घेण्याचा निर्णय घेऊन पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद दिला.
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पेशंट असून जिल्ह्याबरोबरच श्रीरामपुरात ही त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. याकरिता नगराध्यक्षा अनुराधा आदिक व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन आठ दिवस शहर बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.
त्याला आजी-माजी आमदार वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी देखील साथ दिली आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांच्या साथीने हा आठ दिवसांचा लॉकडाऊन यशस्वी होईल असे चित्र आज निर्माण झाले आहे.
कोरोनाचा आजार गरीब-श्रीमंत काही पाहत नाही तो कोणालाही होऊ शकतो. शहरातील सर्व रुग्णालय सध्या फुल्ल आहेत. त्यामुळे आपल्या घरातील कोणालाही कोरोना होऊ नये ही काळजी शहरातील नागरिक घेताना दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी सर्वत्र बंद पाळण्यात आला. शहरामध्ये लॉकडाऊन वरून जे हीन दर्जाचे राजकारण करण्यात आले आहे त्याबद्दल सामान्य जनतेने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीरामपूरला सक्षम नेतृत्वाचा अभाव
कधीकाळी राजकारणामध्ये राज्यात अग्रेसर असलेल्या श्रीरामपूर शहर आणि तालुक्याला आज नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कै. गोविंदराव आदिक आणि कै. जयंत ससाणे यांच्यानंतर विकासाची दूरदृष्टी असलेल्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून कार्य करणारे नेतृत्व या तालुक्यामध्ये निर्माण झालेले नाही. सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी आदिंच्या प्रश्नांची जाण कै. आदिक व कै. ससाणे यांना होती; मात्र, त्यांच्यानंतर एक मोठी पोकळी तालुक्यात निर्माण झाली असून ही पोकळी भरून काढण्यासाठी आता नव्या दमाच्या नव्या नेतृत्वाची नितांत गरज असल्याची भावना देखील तालुक्यातील जनतेतून व्यक्त होत आहे.