साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | गुरुवारी (दि.3) उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत संशयित कोरोना रुग्णांचा थ्रोट स्वाॅब नमुना नगरपरिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्याच्या निर्णयास नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी जोरदार विरोध केला आहे. शहरातील बालकांना लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते, सर्वसामान्य, गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येत असल्याने त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे येथे थ्रोट स्वाॅब घेऊ नये, असे नगराध्यक्षा आदिक यांनी म्हंटले आहे.
काल प्रांत कार्यालयात झालेल्या आढावा बौठकीत थ्रोट स्वाॅब सापेक्ष अपेक्षापेक्षा कमी घेतले जात असल्याची चर्चा झाली. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात संशयित कोरोना रुग्णांचा थ्रोट स्वाॅब घेऊन निदानासाठी पाठविण्यात यावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगरपरिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शहरातील अनेक रुग्ण येत असतात. या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. प्राथमिक आरोग्य केंद्र हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणी संशयित कोरोना रुग्णांचा स्वाॅब थ्रोट घेतल्यास शहरातील नागरिकांना कोरोना संक्रमणाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या निर्णयाचा पूनर्विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वाॅब थ्रोट घेऊ नये, अशी शहरवासीयांची मागणी आहे.
प्रांत कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये संशयित कोरोना रुग्णांचा थ्रोट स्वाॅब नमुना चाचणी नगरपरिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात यावी, या निर्णयाचा मी निषेध करते. कारण या प्रा.आ.केंद्रात शहरातील नवजात बालकांना लसीकरणासाठी आणले जाते. गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. तरी ही चाचणी इथे करू नये. ह्या निर्णयाचा शहराची प्रथम नागरिक या नात्याने मी निषेध करते.
-- अनुराधा गोविंदराव आदिक,
नगराध्यक्षा, श्रीरामपूर नगरपरिषद