साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 सप्टेंबर 2020
अहमदनगर | नगर-मनमाड, नगर-औरंगाबाद महामार्गाची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्ती करावी; अन्यथा सा.बां.विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिला होता. दरम्यान, या महामार्गावरील खड्डे बुजवून दुरुस्ती करणार असल्याचे पत्र जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एन.राजगुरु यांनी, पोटे यांना दिले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड व नगर-औरंगाबाद प्रमुख महामार्ग असून या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावर रोजच वाहनांचे अपघात होत होते. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक निष्पाप जिवांना प्राणास मुकावे लागले. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झालेली असताना सा.बां.विभागाचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. या रस्त्याची दुर्दशा पाहुन सा.बां.विभागाचे लक्ष वेधण्यासाठी व तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी ५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रहारच्या आंदोलनापुर्वीच ४ सप्टेंबर रोजीच जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता एन.एन.राजगुरु यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांना लेखी पत्र दिले असून पत्रात नमूद केले आहे कि, नगर-औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित उद्योजकास २४/०८/२०२० रोजीच पत्र देऊन सूचना दिल्या आहेत. तसेच या महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे काम सुरु करण्यात येऊन तुटलेले डिव्हायडर बसवले जातील .यासोबतच इमामपूर घाट व पांढरी पूल दरम्यान महामार्गावर आवश्यक ते सुचना फलक व दिशादर्शक बसवण्यात येतील व डागडुजी करण्यात येतील. त्याचप्रमाणे नगर-मनमाड महामार्गाचे खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून सिना नदी पात्रापर्यंत डांबरीकरण झाले आहेत. तसेच राहुरी कारखाना येथे रस्त्याला छेद देऊन जल निःस्सारणाचे काम प्रगतीत असून सदर ठिकाणी पाईप पुरवठा झालेला आहे व जल निःस्सारणाचे काम तातडीने हाती घेऊन पुर्ण करण्यात येईल असे पत्रात नमूद करुन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे. याकामी प्रहार जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, अभिजित कालेकर, कृष्णा सातपुते, सरचिटणिस अभिजित पाचोरे, राहाता तालुकाध्यक्ष दिनेश शेळके, संगमनेर तालुकाध्यक्ष प्रदिप थोरात, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे,गणेश कणसे, अमित देशमुख, गोविंद खवडे आदि प्रहार पदाधिकार्यांनी सहभाग घेतला
प्रहारच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह व जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांची अधिक्षक कार्यालयात झालेल्या चर्चेतून कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता आंदोलन तात्पुरते स्थगित करणार असल्याचे अभिजित पोटे यांनी सांगितले.