तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस


साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 सप्टेंबर 2020

हल्ली वाढदिवस म्हटलं की, रस्त्यावर, चौकाचौकात जमणे. फटाक्यांची आतषबाजी करणे. धांगडधिंगा, मौजमजा, मद्यपान करणे. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाणे, पार्टी करणे, बॅनर लावणे, अशा विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढतच चालले आहे. परंतु, काही लोक उच्च पदावर असूनही सामाजिक भान जपत आपला वाढदिवस साजरा करतात. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वृद्धाश्रमात जाऊन साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला. 


तहसीलदारांचा वाढदिवस मोठ्या डामडौलात, मोठ्या हाँटेलात साजरा होईल असे कुणालाही वाटणे सहाजिकच आहे; परंतु,  सामाजिक कार्याची जाण असणारे प्रशांत पाटील यांनी आपला वाढदिवस श्रीरामपूर येथील माऊली वृध्दाश्रमात वृध्दांना मिठाई देवुन तसेच वृध्दाश्रमाला आर्थिक मदत देवुन, वृध्दांचे आशिर्वाद घेत साजरा केला.


श्रीरामपुर येथील सुभाष दशरथ वाघुंडे हे स्वखर्चाने माऊली वृध्दाश्रम या नावाने वृध्दाश्रम चालवतात. या वृध्दाश्रमात पाच-आजोबा, सहा आजीबाई एक किशोरवयीन  अनाथ मुलगा, तीन पगारी सेवेकरी असे पंधरा जण राहतात. सुभाष वाघुंडे यांनी वैयक्तिक सात लाख रुपये कर्ज काढुन आपल्या छोटेखानी जागेत हा उपक्रम सुरु केलेला आहे.  आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी तहसीलदार प्रंशात पाटील वृध्दाश्रमात दाखल झाले. वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांच्याकडून वृध्दाश्रमाची सविस्तर माहीती घेतली. कोरोनामुळे सर्व नियमांचे पालन करुन वृध्दांना मिठाईचे वाटप केले अन वृध्दाश्रमास आर्थिक मदतही केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार देविदास देसाई हे होते. या वेळी आजचा वाढदिवस आयुष्यातील अविस्मरणीय असुन आपले वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच कोरोना सारख्या कठीण परिस्थितीतही चांगले काम करण्यासाठी  उर्जा मिळाली असेही पाटील म्हणाले. 


या वेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे,  किशोर छतवाणी, विकी काळे, भाऊसाहेब वाघमारे, आण्णासाहेब पारखे, सुनिल पारखे,  योगेश नागले, अजिज शेख, अरुण खंडागळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत झुरंगे यांनी केले. माणिक जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रज्जाक पठाण यांनी केले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post