साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 सप्टेंबर 2020
केंद्र सरकारने संसदेत एकतर्फी मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीने निदर्शने करुन राष्ट्रपातींना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
श्रमिक महासंघाचे अध्यक्ष कॉ.बाळासाहेब सुरूडे म्हणाले, कोरोनाचा गैरफायदा घेऊन शेतकरी, कामगार व जनविरोधी घेतलेली धोरणे तातडीने रद्द केली पाहिजे, केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी कायदे रेटायच्या भूमिकेमुळे साठेबाजी करण्यासाठी बड्या व्यापाऱ्यांना कॉर्पोरेट व्यापारी कंपन्यांना रान मोकळे मिळेल. कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत निघतील त्याच बरोबर कंत्राटी शेतीही कायदेशीर केली जात आहे. मोठ्या संघर्षानंतर सर्वसामान्य शेतकरी व कामगारांनी आपले हक्क मिळवले आहे. परंतु केंद्र सरकारने या पारित केलेल्या विधेयकामुळे मोठया प्रमाणात पिळवणूक वाढणार आहेत. मोदी सरकार पाशवी बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पध्दतीने हे कायदे पारित करण्यात आले.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उध्वस्त होणार असून भारतीय नागरिकांचा विरोध असताना शेतकरी व कामगार विरोधी करण्यात आले आहे. हा भारतीय लोकशाहीचा अपमान असल्याचे कॉ.बाळासाहेब सुरूडे यांनी म्हटले.
यावेळी कॉ.बाळासाहेब सुरूडे, कॉ.श्रीकृष्ण बडाख, कॉ.धनंजय कानगुडे, कॉ.जीवन सुरूडे, कॉ. पांडुरंग शिंदे, उत्तम माळी, लखन डांगे,अजय बत्तीसे,बाळासाहेब वाणी,राहुल दाभाडे, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.