श्री गणेशाच्या विसर्जनास कचरा संकलन गाड्या वापरणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा निषेध; केतन खोरे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | कोरोनाच्या महामारीत श्री गणेशाचे विसर्जन करताना सोशल डिस्टन्सिंग पाळली जावी म्हणून प्रशासकीय आदेशानंतर नगरपालिका प्रशासनाने जागोजागी गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी कचरा संकलन करणारी वाहने वापरल्याने नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. नगरपालिका प्रशासनाचा निषेध करावा तितका कमी असल्याची प्रतिक्रिया मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली आहे.

             श्री गणेशाचे विसर्जन करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध परिसरात गणेश मूर्ती व निर्माल्य गोळा करण्यासाठी कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर वापरण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. नगरपालिकेने पर्यायी चांगल्या वाहनांची व्यवस्था करणे गरजेचे होते. याबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ट्रॅक्टर धुवून घेतल्याचे सांगितले.  हे अधिकारी स्वतःच्या घरातील कचरा पेटीत जेवण करायला बसतील का ? कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये मृत जनावरे, शहरातील सर्व प्रकारच्या कचऱ्याची वाहतूक वर्षभर केली जाते. नगरपालिका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत शहरात कचरा संकलन ट्रॅक्टर वापरल्याने नागरिकांच्या धार्मिक भावनांना ठेच बसल्याचे खोरे यांनी म्हटले आहे.

          यापूर्वी अनेकदा नगरपालिका प्रशासनाने सर्वधर्मीय नागरिकांच्या भावना कोणत्या ना कोणत्या कारणांनी दुखावल्या आहेत. इतकी मोठी चूक करूनही श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर वापरण्याचे समर्थन करणा-यांसह श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाचा मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी निषेध केला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post