साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश आता पूर्ण होत आले असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जासोबत बँक खाते व आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र, श्रीरामपूर शहरांमध्ये पोस्ट कार्यालय वगळता इतरत्र कोठेही नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनही या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी, शहराच्या नगराध्यक्षा, नगरसेवक व इतर पक्षांचे पुढारी या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.
पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, बँक कर्मचारी हे सर्वजण आधार कार्डच्या अपूर्ततेमुळे हवालदिल झाले आहेत. जनतेच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासकीय प्रशासन किंवा लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्याने पालक वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये दररोज फक्त 20 जणांचे आधार तयार करण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे काम केले जाते. त्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून नंबर लावून टोकन घ्यावा लागतो. तेथे एकच मशीन असल्याने जादा लोक घेतले जात नाही. त्यामुळे पोस्टामध्ये सुद्धा सर्वांचे समाधान होऊ शकत नाही . शासन पातळीवर 'आधार'ची सुविधा इतरत्र कोठेही उपलब्ध नाही . शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी कालमर्यादा असल्याने जोपर्यंत पालक आधार नंबर आणि बँक खाते नंबर आणून देत नाही तोपर्यंत शिक्षकांना विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता येत नाही . विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यासाठी देखील बँकांची टाळाटाळ सुरू आहे. त्यातच महत्त्वाचा आधार कार्डचा प्रश्न सुटल्याशिवाय पुढील बाबी शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास शासनाने आता मुदतवाढ देण्याची मागणी पालक वर्गाने केली आहे. तहसिलदारांनी आधार कार्ड केंद्राबाबत लवकरात लवकर पावले उचलून शहरांमध्ये प्रत्येक वार्डामध्ये आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणीपालक वर्गाने केली आहे .
आधार कार्ड शिवाय मुलांचे शिष्यवृत्ती फॉर्म तसेच बँक खाते सुरु करणे शक्य नसल्याने आधार कार्ड काढण्याची सुविधा तातडीने उपलब्ध झाली पाहिजे. पालक वर्ग या कागदपत्रांची पूर्तता करीत नसल्याने विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.
--- सलीमखान पठाण, मुख्याध्यापक,
नगर पालिका शाळा क्रमांक पाच.