साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 सप्टेंबर 2020 नेवासा तालुक्यातील एस कॉर्नर ते जोगेश्वरी रस्त्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; अन्यथा 21 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांनी दिला आहे. याबाबत सा.बा.चे कार्यकारी अभियंता (रो.ह.यो.) यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामविकास योजनेतंर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले. कामाची मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्यामुळे कोल्हे यांनी, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता बनसोडे यांच्याकडे तक्रार केली व माहिती अधिकारात रस्त्याची माहिती मागितली होती. वारंवार चकरा मारूनही माहिती मिळाली नाही. दरम्यानच्या काळात तक्रार केल्यामुळे या रस्त्याचे थोडेफार काम केले असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले आहे. कामाचा कालावधी पूर्ण होऊनही रस्त्याचे काम का केले नाही, असा सवाल कोल्हे यांनी केला आहे.
माहितीचे शुल्क भरूनही पावती व माहिती दिली नाही. काम न करताच बिले काढण्याचा हेतू होता का, असाही प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. रस्त्याला साईडपट्ट्या नाही, सिलकोट, कारपेट नाही, साईड गटार नाही, डांबराचा अतिशय कमी वापर केला आहे, असे निवेदनात म्हंटले आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास नगर येथील 'साबा' विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.