साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 सप्टेंबर 2020
बेलापूर (प्रतिनिधी) अहमदनगर जिह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक अनियमितता आढळल्याने ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संग्राम चांडे यांनी आपल्या कर्तव्याचे पालन न केल्याने व कामात हलगर्जीपणा केल्याच्या गंभीर कारणावरुन निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढले.
याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तक्रार करुन कारवाईसाठी पाठपुरावा केला होता.
श्रीरामपूर पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिनांक २७ जुलै १४ आँगस्ट व २ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून आर्थिक अनियमितता व हलगर्जीपणा बाबत निलंबित का करण्यात येऊ नये याबाबतचा खूलासा मागविलेला होता.
दरम्यान, कर्तव्याचे पालन न केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ चा नियम ३ चा ग्रामसेवक चांडे यांनी भंग केलेला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील नियम ३(१) अ मध्ये दिलेल्या तरतुदीस अधीन राहुन या आदेशाद्वारे चांडे यांना आदेश बजावल्याच्या दिनांकापासुन जि.प.सेवेतुन निलंबीत करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
बेलापूर येथील एका व्यक्तीच्या नावे एक लाख ८७ हजार रुपयाचा बेअरर चेक काढण्यात आला. ग्रामपंचायतीत असे अनेक व्यवहार हे रोखीने केल्याचे उघड झाले.
ईलेक्ट्रीक सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता तीन लाख २५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला. पाणी पुरवठा सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता पाच लाख ७५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला.
हा सर्व व्यवहार चेक स्वरुपात होणे आवश्यक होते; परंतु, रकमा रोख स्वरुपात काढण्यात आल्या. तसेच खरेदी केलेल्या वस्तूची ग्रामपंचायतीच्या साठा रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद आढळली नाही.
कॅमेऱ्याची खरेदी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असताना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली नाही. पथ दिव्यांच्या खर्चामध्ये आर्थिक अनियमितता केली. अंगणवाडीची तीन लाख रुपयांची खेळणी ई खरेदी ऐवजी केवळ कोटेशनवर केली.
इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी व पाणीपुरवठ्यातील पाईपलाईनच्या खरेदी आदींबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच चुकीचे काम करणार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जी प सदस्य नवले यांनी केली होती. या तक्रारींची दखल घेत तत्कालीन सीईओ शिवराज पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांना नियुक्त करण्यात आले. आभाळे यांनी विस्तार अधिकारी व्ही एन चर्हाटे आर डी अभंग तसेच कृषी अधिकार्यांच्या देखरेखीखाली दप्तर तपासणी केली.
कामांची बिले व अदा केलेले धनादेश यांचीही माहिती घेतली. चौकशीत नियमांची पायमल्ली केल्याचे व आर्थिक अनियमितता केल्याचे नमूद करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या अहवालाच्या आधारे कर्तव्यात कसुर करुन हलगर्जीपणा केल्याचा गंभीर ठपका ग्रामसेवक चांडे यांचेवर ठेवुन त्यांचे निलंबन केले.