साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | गृहरक्षक दलाच्या निवृत्त जवानांच्या विविध समस्यांबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन आमदार लहु कानडे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील दंगे, नैसर्गिक आपत्ती, यात्रा बंदोबस्त आदी कामांत पोलीस व प्रशासनाला गृहरक्षक दलाचे कायम सहकार्य लाभले. अतिशय अल्प वेतनावर राष्ट्र सेवा बजावूनही निवृत्तीनंतर कुटुंबावर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. राष्ट्रकार्याचे फळ असे मिळाले तर यापुढे कोणीही कर्तव्य बजावणार नाही. गृहरक्षक दलाचे निवृत्त सदस्य आणि दिवंगत सदस्यांच्या विधवांना दरमहा सात हजार रुपये मानधन, कुटुंबांना घरकुल, कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सेवा, निवृत्त सदस्यांच्या पाल्यांना गृहरक्षक दलात सामावून घ्यावे, गृहरक्षक दलासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन आ. कानडे यांनी दिले.
यावेळी कॉ.जीवन सुरूडे,पुंजाराम पठारे, हरिश्चंद्र पवार, अशोक घोगरे, मच्छिंद्र पवार ,इसाक पठाण, भाऊसाहेब बर्डे, ज्ञानदेव शिरसाठ, बाळासाहेब सापते, जब्बार शेख, रंगनाथ शिरसाट, अप्पासाहेब डीके,गोरख शिंदे, सुबान शेख, सुभाष लोखंडे, दत्तात्रेय सापते आदी उपस्थित होते.