साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने परमिट पेक्षा हजारो ब्रास अधिक व 1 मीटर पेक्षा जास्त खोल गौणखनिज उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल सदर कंपनीवर दंड व फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर आजपासून (दि.2) आमरण उपोषणास बसले आहेत.
तसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करुनही कारवाई झाली नाही. मुंबई गौण खनिज कायदा 1955 नियम 33, 29 चा भंग करून व शासनाचे नियम पायदळी तुडवून गट नं. 3 मधील 8.74 आर. क्षेत्रात 1 हजार ब्रास पेक्षाही जास्त खोदाई करून शासनाची फसवणूक करत उपसा केला असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले आहे. शासनाचा मोठ्या प्रमाणात कर बुडलेला आहे. सदर उपोषणास छावा क्रांतिवीर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, राजेश बोरुडे, राहुल क्षिरसागर आदींनी पाठिंबा दिला आहे.