साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या सन 2020 च्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी श्रीरामपूर तालुक्यातून फत्याबाद जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका शोभा सोपानराव शेंडगे यांची निवड करण्यात आली तर केंद्रप्रमुखांमधून बेलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तम केशवराव शेलार हे जिल्हा पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यामुळे श्रीरामपुर तालुक्याला यावर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कारांमध्ये दुहेरी मान प्राप्त झाला.
श्रीमती शोभा शेंडगे या उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांना यापूर्वीसुद्धा विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. मागील महिन्यातच त्यांची श्रीरामपूर तालुका गुरुमाऊली महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील महिला शिक्षिकांचे उत्कृष्ट प्रकारे संघटन त्यांनी केलेले आहे.
उत्तम शेलार हे बेलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख असून सात वर्षाच्या केंद्रप्रमुख सेवेमध्ये त्यांनी सर्व ठिकाणी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षकांचा मित्र असलेला केंद्रप्रमुख असा त्यांचा लौकिक आहे .बेलापूर केंद्रातील अनेक शाळांमधून विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत . श्रीमती शेंडगे व श्री . शेलार यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी यांनी दोघांचे विशेष अभिनंदन केले आहे.