प्रभागात अनेक नागरी समस्या; श्रीरामपूर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष


साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 सप्टेंबर 2020

श्रीरामपूर पालिका हद्दीतील रस्त्यांची पूरती चाळणी झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शहरात जागोजागी असलेला कचरा, घाण पाण्याचे डबके, अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. नगरपारिषदेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्येही अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागाची इतिहासात झाली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असल्याने या भागाला कोणी वाली आहे की नाही?? असा सवाल युवा सेनेचे शहर प्रमुख निखिल पवार यांनी उपस्थित केला आहे. 


               नगर पालिका प्रशासन शहरात काम करत आहे की नाही अशी शंका जनतेला वाटू लागली आहे. या प्रभागात प्रचंड घाण ,कचरा  साचला आहे. कचरा उचलणारे कर्मचारी वेळेवर येत नाही, आले तरी जनतेशी उर्मटपणे बोलतात असा आरोप पवार यांनी केला आहे. थत्ते मैदानावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने चालणेही मुश्किल झाले आहे.  मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे केंद्र म्हणून थत्ते मैदान ओळखले जाते की काय अशी अवस्था झाली आहे. मैदानावरील असलेले व्यायामाचे साहित्य हे सर्व नादुरुस्त झाले आहे. हा ठेका ज्या व्यक्तीला दिला तो कधीही ते दुरुस्त करत नाही. शहरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना प्रभाग सोळा मध्ये खूप कमी वेळ, गढूळ व  बेचव येते असेही पवार यांनी म्हंटले आहे. पालिका प्रशासन आणि नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना अनेक वेळा या समस्या सांगितल्या तरी त्या दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पवार यांनी केला आहे. 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post