साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) शालेय विद्यार्थ्यांना शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे; मात्र, सदरचे खाते उघडण्यासाठी शहरातील अनेक बँका टाळाटाळ करीत असल्याने हजारो विद्यार्थी या शिष्यवृत्ती ला मुकण्याची शक्यता आहे.
शासनाकडून विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इतर मागासवर्गीय शिष्यवृत्ती, अनुसुचित जाती जमाती शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, विमुक्त जाती शिष्यवृत्ती असे अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. पूर्वी या शिष्यवृत्तीची रक्कम ही शाळेचे कडे येत व शाळेमार्फत पालकांना वितरित केल्या जात होत्या; परंतु, यामध्ये गैरप्रकार झाल्यामुळे शासनाने देशभरातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्त्या बँकेमार्फत त्यांच्या खात्यावर प्रदान करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी 0 बॅलन्स वर बँकांना खाते सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. मात्र पालक या खात्यांवर कोणतेही व्यवहार करीत नसल्याने बँकांसाठी सुद्धा ही एक डोकेदुखी ठरली आहे. त्यातच शहरातील काही बँकांनी याबाबत तुघलकी निर्णय घेऊन पालकांची अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र बँकेमध्ये दहा वर्षाच्या आतील मुलांचे खाते उघडले जात नाही तसेच माता-पालक म्हणून चालत नाही. त्यामुळे ही बँक खाते उघडण्यास नकार देत आहे.
इतर बँकासुद्धा शिष्यवृत्ती खात्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. शहराचा मोठा विस्तार पाहता वेगवेगळ्या परिसरांचे वाटप बँकांसाठी वेगवेगळ्या भागात करण्यात आले आहेत .वार्ड नंबर 2 साठी स्टेट बँकेची मार्केट यार्ड शाखा नियोजित केली आहे . वास्तविक पाहता सेंट्रल बँक, स्टेट बँक या जवळच्या बँका असताना पालकांना मार्केट यार्ड शाखेत जावे लागते . पूर्वी दशमेश नगर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असल्याने वार्ड नंबर 1 व 2 मधील सर्व विद्यार्थ्यांची खाती तेथे होती. परंतु सदरची शाखा शिवाजी रोडला स्थलांतरित झाल्याने आता या बँकेचे कर्मचारी सुद्धा खाते उघडण्यास टाळाटाळ करीत आहेत.
काही बँकाकडून ग्राहक सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाईन खाते उघडले जाते मात्र दोन दोन महिने खाते नंबर देत नसल्याने पालक हैराण झाले आहेत.
याबाबत शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांचे पुढारी देखील लक्ष घालत नसल्याने पालकांनी शिष्यवृत्तीच नको अशी नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या वर्षी हजारो विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.