साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 सप्टेंबर 2020
राहुरी | राहूरी तालुक्याच्या राजकारनात नव्हे तर छोट-मोठया निवडणुकीत कायम महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या विकास मंडळात फूट पडली असून स्व.रामदास धुमाळ यांचे राजकिय वारसदार तथा पुतणे अमृत धुमाळ यांनी विकास मंडळ असतानाही स्व.रामदास धुमाळ विचारमंच स्थापना करून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुका विकास मंडळात कार्यकर्त्यांना सन्मान भेट नसल्याने मुसळवाडी येथे काल स्व.रामदास धुमाळ यांचे राजकीय वारसदार तथा पुतणे अमृत धुमाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना अमृत धुमाळ पुढे बोलताना म्हणाले की, राहुरी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम रामदास धुमाळ यांनी केले आहे. त्यांच्या जाण्यानंतर तालुक्यामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. रामदास पाटील धुमाळ हे स्वतः च एक संघर्ष शील विचार होते. त्यांनी आयुष्यभर हुकूमशाहीचे विरोधात लढा देऊन सर्वसामान्य गरिबातील गरीब कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केले. कार्यकर्त्याला स्वाभिमानी बाण्याने जगण्याचे शिक्षण देऊन राहुरी तालुक्यामध्ये जातीपातीचा विचार न करता गटातटाचा विचार न करता फक्त होतकरू तरुण हे उद्दिष्ट समोर ठेवून मुळा-प्रवरा वीज संस्था, राहुरी कारखाना, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मीनारायण ट्रस्ट व अन्य तालुक्याबाहेर देखील इतर संस्थांमध्ये आपल्या ओळखीचा व अधिकाराचा वापर करून युवकांना नोकरी देण्याचे काम केले. कुणाकडून एकही रुपया न घेता कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी अनेकांचे प्रपंच उभे केले. आज ते नेतृत्व मावळले असल्याने कार्यकर्ते नेतृत्वहिन होऊन गोंधळून गेलेले आहेत. सर्वांना पुन्हा एकदा एका छत्राखाली आणून सन्मानाने उभे करण्यासाठी आम्ही लोकनेते स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ मित्र मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. नानांच्या विचाराचे कार्यकर्ते जे आज अनेक वेगवेगळ्या पक्षात काम करीत आहेत. त्या सर्वांना बरोबर घेऊन नानांचा विचार जीवंत ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. तालुक्यातील नानांच्या विचाराचे कार्यकर्ते हे स्वाभिमानी असून ते स्वतः तन- मन धनाने सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. त्या सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. रामदास नाना धुमाळ प्रत्येक वेळी तालुक्याच्या बाबतीत राजकीय असेल सामाजिक, शैक्षणिक असेल असा कोणताही निर्णय सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन घेत होते. नाना म्हणजे चैतन्य होते,नाना म्हणजे उत्सव होता.एखाद्या महत्त्वाच्या सभेत नानांनी काय भाषण करणार याकडे राज्यातल्या जाणकारांचे लक्ष असायचे. त्यामुळेच तालुक्यात विधानसभेत सत्तापरिवर्तन झाले होते. आज पुन्हा एकदा नानांच्या विचाराचा लहान मोठा कार्यकर्ता पुन्हा उभा करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. त्यासाठी तिळापूरपासून तर म्हैसगाव पर्यंत व बेलापू पासून वावरथ जांभळी पर्यंत आणि सोनगाव सात्रळ पासून कात्रड गुंजाळपर्यंत प्रत्येक गावात नानांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे.त्या प्रत्येक कार्यकर्त्याला पुन्हा एकदा एका छत्राखाली आणण्याचा निर्धार आम्ही केला असून येत्या विजयादशमीला सुरक्षित अंतर ठेवून नानांचा विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची वज्रमूठ दसरा महामेळाव्यात बांधणार असल्याचे अमृत धुमाळ यांनी सांगितले.सध्या कोविड परिस्थिती असल्यामुळे असल्यामुळे शक्य तेथे घरी जाऊन तसेच मोबाईल फोनवर जुन्या नव्या कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.पंढरीनाथ पवार, नानासाहेब पवार ,भास्करराव जाधव, अशोक ढोकणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.