साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 सप्टेंबर 2020
शिर्डी | शिर्डी नगरपंचायतीतील कंत्राटी सफाई कामगारांचा 3 महिन्यांचा थकीत पगार तातडीने अदा करावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा नगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कॉ.राजेंद्र बावके व कॉ.जीवन सुरूडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार पासून कामबंद आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यामुळे शहरात साफ सफाईचे सर्व काम ठप्प होत स्वच्छतेचा मोठा प्रश्न तयार झाला होता.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवण्याचे काम सातत्याने प्रामाणिकपणे केले.सफाई कर्मचाऱ्यांच्या या सातत्यपूर्ण कामामुळे केंद्र व राज्य सरकारकडून दोन वेळा स्वच्छ शहराचे बक्षीस मिळाले.परंतु पगार वेळेत न झाल्याने कामगारांची व त्यांच्या कुटुंबाची मोठी आर्थिक हेळसांड होत होती त्यामुळे नाईलाजास्तव थकीत वेतन जोपर्यंत होत नाही तो पर्यन्त शहरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता होणार नाही असा पवित्रा कामगार युनियनने घेतला.या आंदोलनाची दखल घेत मा. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करत त्यांच्या उपस्थितीत कामगार युनियन, ठेकेदार कंपनी व नगरपंचायत प्रशासन यांची बैठक घेण्याक्त आली. सदर बैठकीत कामगारांचे थकीत 3 महिन्यांचे पगार तातडीने अदा करण्याचे नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांनी मान्य केलेनंतर सदरचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.तसेच कामगारांच्या इतर प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी नगरपालिका कामगार युनियनचे कॉ.राजेंद्र बावके, कॉ.जीवन सुरूडे, सचिन आढाव, प्रभाकर लांडगे,दत्तात्रय आरणे, अनिल त्रिभुवन, संदीप काटकर, हेमंत बनसोडे, प्रभाकर कांदळकर, कृष्णा घोलप,लक्ष्मी पवार,मंदा खरात, संगीत आरणे, ज्योती परे,सचिन शेजवळ,साईनाथ कांबळे,अनिल मोरे,आकाश आरणे,मधुकर भोंगळे आदींनी प्रयत्न केले.