साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | शहरातील मुख्य रस्त्यांची कामे त्वरित करावीत; अन्यथा भाजप श्रीरामपूरच्या वतीने नगरपालिकेचे गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे संघटन सरचिटणीस अक्षय वर्पे यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात वर्पे यांनी म्हटले आहे की, मेनरोड, नेवासा-संगमनेर रस्ता, नॉर्दन ब्रँच ते सरस्वती कॉलनी रस्ता, फातेमा हौसिंग सोसायटी कॅनॉल रस्ता, साई मंदिर ते संजयनगर रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून सत्तेत बसून फक्त जिरवाजिरवीत धन्यता मानणाऱ्या सत्ताधारी नेत्याला याचे सोयरेसुतक राहिलेले नाही. पहिले अडीच वर्षे राज्यात भाजपची सत्ता असल्याने आम्हाला निधी मिळत नाही असे सत्ताधारी नेते ओरडायचे. गेल्या वर्षभरापासून राज्यात दोन्ही काँग्रेस सत्तेत असतानाही नगरपालिकेतील सत्ताधारी विकास निधी आणण्यात अपयशी ठरले आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून पावसाळा झाला की रस्त्यांची कामे सुरू करू इतकाच एक डायलॉग मारून पळवाट शोधण्याचा फंडा सत्ताधारी करत आहेत. त्यांचे शहर "भकासाचे व्हिजन" उघड झाल्याची रोखठोक टीका अक्षय वर्पे यांनी केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांची कामे न करणे, निकृष्ट दर्जाची इतर रस्त्यांची कामे करणे, वाढीव रकमेने ठेके देणे, ठेकेदाराच्या लाभासाठी रस्त्यांचे डांबरीकरण कामाचे टेंडर न करता खडीकरण कामाचे टेंडर करणे, खाजगी मालमत्ता विकसित करण्यासाठी नगरपालिकेच्या पैशाचा वापर करून जनतेला वेड्यात काढत अनागोंदी कारभार नगरपालिकेत सुरू आहे. नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावर अंकुश ठेवावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. मुख्य रस्त्यांची कामे त्वरित न केल्यास श्रीरामपूर शहर भाजपचे नेते गणेश राठी, तालुकाध्यक्ष सुनील वाणी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शशिकांत कडूस्कर, मा.शहराध्यक्ष मारुती बिंगले, अरुण धर्माधिकारी, विलास थोरात, सतीश सौदागर, राजेंद्र कांबळे, अजित बाबेल, बाळासाहेब अहिरे युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रवी पंडित, अक्षय नागरे, आनंद बुधेकर, ओंकार झिरंगे, निलेश जगताप, अमोल आंबिलवादे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नगरपालिकेचे गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.