साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे या भागातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. त्यातून जनतेची सुटका करावी, सर्व रस्त्यांचे डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रीटीकरण करावे, गरजेप्रमाणे पेविंग ब्लॉक बसवावे, अशी मागणी सोमवारी (दि.24) प्रभागातील नागरिकांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
नगरपालिका प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रभागात संजय नगर सोसायटी, रामनगर,संजयनगर परिसर,ईदगाह परिसर, अचानक नगर, गोपीनाथनगर परिसर, मिल्लतनगर परिसर, उस्मानिया मस्जिद परिसर असा विस्तृत भाग आहे. यात सगळीकडे रस्ते खराब झालेले असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर पायी चालणे मुश्किल होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये अबाल वृद्ध, गर्भवती असणाऱ्या माता भगिनींना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे, भागातील नागरिकांच्या वतीने आज निवेदन देण्यात येऊन त्यामध्ये सर्व रस्ते हे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण अथवा गरजेप्रमाणे पेविंग ब्लॉक चेच करण्यात यावे, अशी मागणी करत रस्त्यांची सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली.
रस्ते होत असताना माती मिश्रित मुरुमाची न होता दीर्घ काळ टिकणारी पक्क्या स्वरूपात करण्यात यावी अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली. निवेदनाची तात्काळ दखल न घेण्यात आल्यास नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी आंदोलने करण्याची वेळ आजच्या कोरोना सारख्या महामारी मध्ये येऊ नये असेही म्हंटले आहे. निवेदनाची प्रत नगराध्यक्षा अनुराधताई आदिक यांना देण्यात आली.
यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी निवेदनावर सह्या करून कोरोनाचे प्रशासनिक नियमांचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात शरीफ भाई शेख,राहुल कुलकर्णी, रवि बोर्डे, मनीष पंचमुख, इम्रान भाई दारुवाला,इम्रान पटेल,बबलू म्हस्के,अभिजित चक्रे,आयुब पठाण,अविनाश पंडित आदी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितत देण्यात आले.