साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर नगरपालिका श्रीरामपूरकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. काही दिवसापासून शहरात पिण्याचे पाणी अचानक खराब येत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, जुलाब व इतर आजार पसरत आहे. पालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे त्वरित थांबवावे ; अन्यथा छावा स्वराज्यरक्षक सेनेच्या वतीने नगरपालिकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेख यांनी म्हटले आहे की, सारे जग कोरोना महामारी आणि आर्थिक संकटाने वैतागले आहे. त्यात श्रीरामपूर शहरातसुद्धा कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यात शहराची संपूर्ण जबाबदारी असणारी श्रीरामपूर नगरपालिकेने श्रीरामपूरकरांच्या अडचणी दूर करायच्या की त्यात वाढ करायची?? असा संतप्त सवाल शेख यांनी केला आहे. आज कोणी आजारी पडले तर सर्वसामान्य माणसाला दवाखाना करण्यासाठी सुध्दा पैसा त्यांच्याकडे नाही. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे त्वरित थांबवावे; अन्यथा छावा स्वराज्यरक्षक सेनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिके विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असे छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी सांगितले.