श्रीरामपूर | जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग हे श्रीरामपूर येथील शांतता समितीच्या बैठकीसाठी आले असता, सदरच्या बैठकीनंतर भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी पोलीस अधीक्षक सिंग यांची भेट घेऊन अशोकनगर येथील पोलीस चौकी हरेगाव फाटा येथे बेकायदेशीर हलविल्याबाबत प्रश्न उपस्थित करून निवेदन दिले.
मागील महिन्यापासून हरेगाव फाटा येथे उभारलेल्या अनधिकृत पोलीस चौकी बाबत वाद उपस्थित झालेला असतांना निपाणी वडगांव ग्रामपंचायत हद्दीतील अधिकृत मंजुरी व पोलिसांना सजेचे ठिकाण असलेली अशोकनगर पोलीस चौकी पळवून हरेगाव फाटा येथे आणून त्या चौकीचे 'अशोकनगर पोलीस चौकी' असे नामकरण केले. तेव्हापासून अशोकनगर येथील पोलीस चौकीस टाळे लागलेले असून सजेच्या ठिकाणी नेमणूका असलेल्या पोलिसांनी त्या ठिकाणी भिरकूनही पाहिलेले नाही. गावची लोकसंख्या मोठी असल्याने सदर पोलीस चौकीस अधिकृत मंजुरी मिळालेली आहे. तरीही पोलिसांनी परस्पर निर्णय घेऊन तेथील सर्व टेबल, खुर्च्या उचलून हरेगाव फाटा येथील पोलीस चौकीत आणल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थानीं तीव्र विरोध करून ग्रामपंचायतचा ठरावही मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले होते. तरीही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे कॉ.बडाख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना समक्ष भेटून तक्रार केली. सदरचे निवेदनाचे अवलोकनानंतर पोलीस अधीक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी, पोलीस अधीक्षकांना सांगितले की "सदरच्या चौकीस मी परवानगी दिलेली नाही" असे स्पष्ट केले. यावेळी समोरच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट ही उपस्थित होते पण त्यांनी या विषयावर चुपी साधल्याने सदरचे निवेदन स्वीकारून मी यावर माहिती घेतो असे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक रवाना झाले. या प्रकरणी आता पोलीस अधीक्षक काय कार्यवाही करतात याकडे आता अशोकनगरकरांचे लक्ष लागून आहे. या प्रश्नी ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.