साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांवर आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवारी (दि. 17) 'सेल्फी विथ खड्डे' आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला नगर पालिकेतील सत्ताधारी व विरोधक जबाबदार आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी 'सेल्फी विथ खड्डे' या आंदोलनप्रसंगी केला. 'तुम्ही मारल्यासारखे करायचं मी रडल्यासारखे करेल, एवढेच नगरपालिकेत चालले आहे.
शहरातील विविध भागातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत सर्व रस्त्यावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे निर्माण झालेले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा होऊन रस्त्यातील साचलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले. अनेकांचे जीव अपघातात गेले अनेक जन कमी अधिक प्रमाणात अपंग झाले. काही व्यक्ती आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. अनेक भागात रस्ता नसल्यामुळे चिखलातून लोकांना जाणे येणे करावे लागते आणि त्यामुळे आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरांमधील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने वेळोवेळी स्पायडरमॅन आंदोलन,मुंडन आंदोलन, गांधीगिरी, वृक्षरोपण, घंटानाद, विविध प्रकारचे आंदोलन केल्यानंतर नगरपालिका प्रशासन फक्त कामाचा देखावा करते. त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी व चांगले काम करण्यासाठी सेल्फी विथ खड्डे आंदोलन यावेळेस करण्यात आले.
शासन योजनेंतर्गत नगरपालिका निधीमधून शहरातील सर्व रस्त्याची नवीन डांबरीकरण व काही रस्त्यांची देखभाल,दुरुस्ती, डागडुजी करण्याचे नाटक केले.परंतु, वर्षभरातच सर्व रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामांमध्ये नगरपालिका भ्रष्टाचार करीत असल्याचा संशय यानिमित्ताने व्यक्त होत आहे. राजकीय द्वेषाने पछाडलेल्या सत्ताधार्यांनी रस्त्याची कामे करण्यास जाणून बुजून टाळले आहे व आजही टाळत आहेत. त्यामुळे, शहरवासीयांवर मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मानव निर्मित आपत्तीने इच्छा नसताना मरणे, अपंग होणे हे नशिबी येत आहे. सत्ताधारी मात्र न झालेल्या विकासाच्या गप्पा मारण्यात मशगुल आहेत. विकासाचे गाजर दाखवून सामान्य माणसाची नगरपरिषदेने घोर फसवणूक करीत आहे. शहराहतील सर्व रस्त्याची मजबुतीकरण्यासह डांबरी करण त्वरीत होवो, नागरिकांची मरणाची वाट पाहू नका तुम्हाला येथेच सर्व फेडावे लागेल. देव तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा तिलक डुंगरवाल यांनी दिला.
सत्ताधार्यांनी शहरातील रस्त्यांचे कामे न केल्यामूळे नगरपालिकेच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड, मेन रोड, नेवासा रोड, गोंधवणी रोड, या प्रमुख रस्त्यावर सेल्फी विथ खड्डे हे आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्याचे कामे त्वरित न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळेस देण्यात आला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपचे तिलक डुंगरवाल, राहुल रणपिसे, प्रविण जमधडे, प्रताप राठोर, किशोर वाडीले, विकास डेंगळे, यशवंत जेठे, सचिन आजगे, जयेश पाटील,अभिजित राज मोहम्मद शेख ,अक्षय कुमावत, अनिल ढगे, तरबेज शेख आधी कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.