साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) जगप्रसिद्ध उर्दू कवी डॉक्टर रहात इंदोरी यांच्या निधनाची बातमी कानावर पडताच श्रीरामपूरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच शोक पसरला. अनेकांनी त्यांच्या श्रीरामपूर भेटीच्या आठवणी जागविल्या.
मुशायरा कमिटीचे संस्थापक सलीमखान पठाण यांना शहरातील अनेकांनी फोन करून राहत इंदोरी यांच्या श्रीरामपूरातील कार्यक्रमाबाबत विचारणा केली. 2006 आणि 2011 साली राहत इंदोरी श्रीरामपूर येथील कौमी एकता मुशायरा कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन वेळा श्रीरामपूरला आले होते. दोन्ही वेळी त्यांनी आपल्या शायरीने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. पहिल्यांदा श्रीरामपूरला आले त्यावेळी ते इंदोर होऊन नाशिकला आले. तेथून खास त्यांना आणण्यासाठी मुशायरा कमिटीचे साजिद मिर्झा आणि एजाज मुसा शेख हे नाशिकला गेले होते. त्या आठवणी साजिद मिर्झा यांनी सांगताना राहत इंदोरी यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडले. आपल्या शायरी ने सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणारे राहत साहेब अतिशय हळव्या मनाचे होते. शायरीच्या मानधनातून मिळणारी बिदागीची रक्कम त्यांनी गोरगरीबांना मदत म्हणून दिल्याचे आठवणी सुद्धा अनेक शायर लोक सांगतात. श्रीरामपूरातील त्यांचे दोन्ही कार्यक्रम आजारामर झाले. त्यांचा हा शेर समंदरोके सफर मे हवा चलाता है, जहाज खुद नही चलते खुदा चलाता है, यहा तो लोग पाव नही जहन से अपाहिज है, उधर चलेंगे जिधर रहनुमा चलाता है, हा त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाला.
2011 साली त्यांना मुशायरा कमिटीतर्फे रफअत ए परवाज नॅशनल अवार्ड हा राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार आमदार जयंत ससाणे यांच्या हस्ते श्रीरामपूरच्या मुशायरा मध्ये प्रदान करण्यात आला होता. नगरपालिकेतर्फे सुद्धा तत्कालीन उपनगराध्यक्ष अंजूमभाई शेख यांच्या पुढाकाराने पालिका सभागृहात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मुशायरा कमिटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण, संघटक मुन्ना पठाण, साजिद मिर्झा, मोहम्मद रफीक शेख, रवि गुलाटी, आरीफ बागवान, जावेद का झी, संजय जोशी, शांतीलाल पोरवाल, अॅड विजय बनकर, राजेश अलघ, सलीम जहागिरदार, रियाज पठण आदींसह अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.