साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | जेष्ठ क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक दत्ता विघावे यांना त्यांच्या क्रिकेटच्या सर्वच क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेतील ग्लोबल पिस युनिव्हर्सिटी यांनी मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानीत केले आहे.
सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभर सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम स्थगित असल्यामुळे विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी संदर्भातील सर्व दस्तऐवज दत्ता विघावे यांना टपालाद्वारे पाठविला आहे.
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंटचे ( डब्ल्यूसीपीए ) आंतरराष्ट्रीय सदस्य असलेले दत्ता विघावे डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र श्रीरामपूर चॅप्टरचे अध्यक्ष आहेत. तसेच युनायटेड नेशन्सच्या ग्लोबल टॅलेंट पूलचे सदस्यही आहे.
दत्ता विघावे व त्यांचा पुत्र ऋषिकेश विघावे या पितापुत्रांनी शासकीय क्रिकेट स्पर्धांच्या सलग ३२ सामन्यात पंचगिरी करून जागतिक विक्रम स्थापित केला आहे. या विश्वविक्रमाची ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
दत्ता विघावे यांचे क्रिकेटच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे अनेक लेख वृत्तपत्रे, समाज माध्यमे, विविध नियतकालिंका मधून प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी ग्रामिण भागातील होतकरू व गुणवंत खेळाडूंना परदेशात नेऊन खेळण्याचा अनुभव देण्यासाठी परदेश दौरेही केले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
"महामाय" हा आई या विषयावरील विश्वविक्रमी सामुहीक काव्य खंडाचे संपादनही दत्ता विघावे हे करत असून त्यांचे कथा व कविता संग्रहही प्रकाशित झाले आहेत. शिवाय पत्रकारितेतही ते सक्रीय आहेत.
Tags
शैक्षणिक