साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 जुलै 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव अशोक नगर फाटा परिसरात, शिवसेनेचे सदाशिव कराड हे आपल्या दुचाकीवरून जात असताना पाटाच्या कडेला उसाच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत कराड यांच्या हाताला चावा घेतला. शर्टाची बाही फाडली. दरम्यान कराड यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने तात्काळ उसाच्या दिशेने पाटातून झेप घेऊन पोबारा केला.
बिबट्याने दोन दिवसापूर्वीच एका लहान तीन वर्षाच्या बालकाला घरासमोरून अंगणातून ओढण्याचा प्रयत्न केला होता. महिलेच्या दक्षतेने बिबट्याच्या तावडीतून मुलगा बचावला आहे तसेच काल रात्री येथील जोशी वस्तीवरील वायकर यांच्या गाईचा बिबट्याने कान तोडला आहे तसेच खडी क्रेशर खाणीच्या परिसरात एका शेळी वरही बिबट्याने हल्ला केला आहे श्री.कराड यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी परिसरात वार्यासारखी पसरली त्यानुसार ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळेस नागरिकांमधून वन विभागाचे अधिकाऱ्यास मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला होता. त्यानुसार घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी एस एम लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती कळवली त्यानुसार नागरिकांना परिसरात पिंजरा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवसेनेचे सदाशिव कराड यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय शिरसगाव हलविण्यात आले त्यानुसार तेथे प्राथमिक उपचार करण्यात येऊन त्यांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलवण्याची माहिती देण्यात आली. परिसरातील नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशोकनगर फाटा निपाणी वडगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसत आहे याठिकाणी लपण्यासाठी मोठी जागा उपलब्ध असून उसाचे मोठे क्षेत्र आहे. यासंदर्भात गणेश सदाशिव कराड, रवींद्र पवार, शरद देवकर, गंगाधर देसाई, चांगदेव देसाई, चंद्रकांत मोरकर, संपतराव देसाई, बाळासाहेब सुलताने, रवींद्र सुलताने, दादासाहेब देसाई आदी परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांनी परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.