कोरोना'ला हरवून ९० वर्षांच्या आजीबाईं परतल्या ; घरी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मानले आभार

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जुलै 2020
अहमदनगर | जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज नगर शहरातील ९० वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात करुन उपचारांना प्रतिसाद दिला तर रुग्ण बरा होऊ शकतो हे दाखवून दिले.

              या आजीबाईंसह एकूण ०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आजीबाईंनी उपचार करणार्या  डॉक्टर, नर्सस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही माझ्यावर चांगले उपचार केले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 'डॉक्टर्स डे' च्या दिवशी रुग्णांकडून मिळालेली ही पावती या डॉक्टरांनाही मनात जपून ठेवावीशी वाटली. 

         दिनांक २२ जून रोजी नगर शहरातील या आजीबाईंना त्रास जाणवू  लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.  त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव आला. दरम्यान, प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना २-३ दिवस तेथील आयसीयू कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आणि कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.  आज या आजीबाईंसह नगर शहरातील इतर दोन रुग्ण तसेच श्रीरामपूर येथील एका रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तर पुणे येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णासही डिस्चार्ज मिळाला.

              दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३१२ झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची  संख्या १४९ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ जण मृत्यू  झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७५ झाली  आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post