साईकिरण टाइम्स ब्युरो 15 जुलै 2020
श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) श्रीरामपूर तहसील कार्यालयात अनधिकृतरित्या पैसे घेऊन कामे केली जात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, गोरगरीब जनतेचे नियमबाह्यरित्या पैसे घेऊन कामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. सामान्य जनतेने, 'भाड' खाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे ( जनतेच्या नोकरांचे ) 'स्टिंग' ऑपरेशन करून त्यांचे 'पाप' चव्हाट्यावर आणून 'नायक' होण्याची खरी गरज आहे. लाचखोर सडक्या व्यवस्थेविरोधात जनतेने पेटून उठून 'इन्कलाब' घडवण्याची वेळ आली आहे.
शासकीय कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय निर्धारित वेळेत, निर्धारित शुल्कात नियमाप्रमाणे कामे केली जात नाही. गोरगरिबांचे रक्त पिणाऱ्या लाचखोर शासकीय कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे मुजोर कर्मचारी बिनदिक्कतपणे नागरिकांकडून नियमबाह्य पैसे मागतात. पैसे दिले नाही तर काम केले जात नाही. शासनाकडून म्हणजेच जनतेच्या पैशातून लठ्ठ वेतन घेणाऱ्या लाचखोर शासकीय कर्मचाऱ्यांवर श्रीरामपूरचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कारवाई करणार का?? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.
तहसील कार्यालयात रेशनकार्ड संबंधीही सर्व कामे करून घेण्यासाठी नागरिकांना 'चक्कर पे चक्कर' मारावे लागतात. कोणते काम किती कालावधीत होईल? त्यासाठी किती शुल्क लागेल?? कोणते काम कोणत्या लोकसेवकाकडे ( जनतेच्या नोकराकडे ) आहे?? प्रत्येक कर्मचाऱ्याचे नाम, पदनाम, अधिकार, कर्तव्ये, जबाबदारी यांची माहिती श्रीरामपूर तहसील कार्यालयात लावण्यात आलेली नाही. या सर्व बाबींचे स्पष्ट माहितीफलक दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे.