साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 जुलै 2020
श्रीरामपूर | शहरात विनामास्क फिरणे, लग्नसमारंभात ठरवून दिलेले निकष न पाळणे, फवारणीचा केवळ दिखावा करणे, शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, हातगाडी वरून भाजी विकण्याची परवानगी असताना रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांची होणारी गर्दी, यावर प्रशासनासह नगरपालिकेने उपाययोजना करून नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यास 'श्रीरामपूर बंद' करण्याची गरज नाही, असे मत शिवसेनेचे राजेंद्र देवकर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देवकर यांनी पुढे म्हंटले की, श्रीरामपूर बंद करून काहीही उपयोग नाही ; कारण श्रीरामपपूरात बाहेरून व श्रीरामपूरातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. लग्न संभारंभात ठरवून दिलेले निकष लोकं पाळत नाहीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.
हातगाडीवरून भाजीपाला विकण्याची परवानगी दिली असतांना कॅनॉलकडेला, नेवासा रोडवर दोन्ही बाजूला भाजी विक्रत्याकडून मोठी गर्दी असते.
मास्क न लावता शहरात लोकं फिरत असतात त्यांच्यावर कारवाई करावी.
शहरात कुठलीही फवारणी नाही फक्त पावडर टाकण्याचा दिखावा असतो असा आरोप देवकर यांनी केला आहे.
शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला दिसतो, ही सर्व कामे प्रशासन व पालिकेने केले तरी 'श्रीरामपूर बंद' करण्याची गरज वाटत नाही, असे देवकर यांनी म्हंटले आहे.
'श्रीरामपूर बंद' करायचेच असेल तर फक्त हाॅस्पिटल मधील मेडिकल उघडे ठेवावे ; कारण अन्य मेडिकलमध्ये औषध कमी जनरल स्टोअरची साहित्य जास्त मिळतात.
त्यामुळे, सर्व मेडिकल बंद ठेवून फक्त हाॅस्पिटलमधील मेडिकल उघडे ठेवावीत. दूध चालू ठेवून बाकी सर्व कडकडीत बंद करावे, याने सर्वाना समान न्याय मिळेल.
हे कुणालाही विरोध करण्यासाठी नाही तर सर्व उपाययोजना करून बाजारपेठ सुरळीत चालावी, हिच प्रामाणिक भावना असल्याचे राजेंद्र पाटील देवकर यांनी म्हंटले आहे.