साईकिरण टाइम्स ब्युरो, 7 जुलै 2020
अहमदनगर | श्रीरामपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसगणिक वाढत असताना नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडून कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी करणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुजोर, बेजबाबदार दोषी कर्मचाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी, राजेश बोरुडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती ; या गंभीर प्रकाराची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून मंत्रालयातील कक्ष अधिकारी उदय सार्दळ यांनी जिल्हा प्रशासन व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नियमानुसार कार्यवाही करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, जिल्हा नियंत्रण कक्ष आपत्ती व्यवस्थापन अहमदनगर शाखेचे नोडल अधिकारी शाहूराज मोरे यांनी, नगरपालिका शाखेच्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना बोरुडे यांच्या तक्रारीवर नियमोचित कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
श्रीरामपूर शहरात गुरुवारी (दि.2 जुलै ) एकाच दिवशी 5 कोरोना बाधित आढळले असताना श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान प्रियदर्शनी मंगल कार्यालयात दारूच्या पार्ट्या करत होते. याबाबत दै. 'लोकमत'मध्ये वृत्त प्रसारीत झाल्यामुळे जिल्ह्यासह राज्यभर या वृत्ताची चर्चा झाली. या वृत्ताचा हवाला देत बोरुडे यांनी थेट मुखमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे तक्रार केली. या गंभीर तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 'साईकिरण टाइम्स' मध्ये 'दारूच्या पार्ट्यांमुळे श्रीरामपूर नगरपालिका अवघ्या महाराष्ट्रभर बदनाम' या मथळ्याखाली 3 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची अहमदनगर जिल्हाभर चर्चा झाली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे वृत्त व्हायरल झाले होते.
शहरात कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरवात झाली आहे. श्रीरामपूरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरवासियांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी शहरात आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून म्हणजेच जनतेच्या पैशातून लठ्ठ वेतन दिले जाते. आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत शहरातील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडून दारूच्या पार्ट्या करत असल्याने श्रीरामपूर नगरपालिका अवघ्या महाराष्ट्रभर बदनाम झाली असल्याचे बोरुडे यांनी म्हंटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदार दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी ; अन्यथा, 'इन्कलाब' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची अन्नान दशा झाली आहे. कामधंदे नाहीत. पैसा नाही. खायला अन्न नाही. जगणे कठीण झाले आहे, असे असताना शासनाकडून म्हणजेच जनतेच्या पैशातून भरघोस वेतन घेऊन कार्यालयीन वेळेत दारूच्या पार्ट्या करणाऱ्या मुजोर, बेजबाबदार, मस्तवाल दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
--- राजेश बोरुडे