साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जुलै 2020
श्रीरामपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार उपलब्ध नसल्यमुळे अनेकांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्काची होत असलेली मागणी चुकीची असून अडचणीच्या काळात कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
विश्वविद्यालय अनुदान आयोगाने देखील या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्कासाठी आग्रह करू नये, अशा प्रकारची सूचना सर्व महाविद्यालय व विद्यापीठांना केली आहे. अनेक महाविद्यालयांकडून शैक्षणिक शुल्काची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांकडून शुल्काची मागणी करू नये ; अन्यथा, अभाविपच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. अभाविपने दिलेल्या निवेदनाची सर्व महाविद्यालयांनी दखल घेतली नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी शहर मंत्री हंसराज बत्रा, अभाविपचे उत्तर नगर जिल्हा सहसंयोजक श्रेयस झिरंगे, आनंद बुधेकर, सौरव फुणगे, शिवराज रसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.