साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जुलै 2020
श्रीरामपूर | बेलापूर रोड परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून त्या परिसरातील नागरिकांच्या स्वॅब किंवा रॅपिड टेस्ट तात्काळ कराव्यात, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्या, प्रभागाच्या नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शिंदे व कोविड सेंटर समन्वयक डॉ.वसंत जमदाडे यांचेकडे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना सौ.स्नेहल खोरे म्हणाल्या की, गेल्या चार दिवसांपूर्वी बेलापूर रोड परिसरातील एका जेष्ठ महिलेचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून सदर महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतः पुढे येत कोरोना चाचणी करून घेतली. त्यातील चार व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांच्या स्वॅब किंवा रॅपिड टेस्ट तात्काळ करणे गरजेचे आहे. त्यामुळे या परिसरात वाढू बघणारे कोरोनाचे संक्रमण रोखणे शक्य होईल असा विश्वास खोरे यांनी व्यक्त केला.
यासोबतच परिसरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोनाची लक्षणे उशिरा दिसतात ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन स्वॅब किंवा रॅपिड टेस्ट करून घ्याव्या असे आवाहन नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे यांनी केले आहे.