साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 जुलै 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून पूर्णवादनगर, मुळा प्रवरा परिसर, थत्ते मैदान परिसर, लबडे वस्ती परिसरातील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय अंगणवाडी सुरू झाल्याने दूर झाल्याची माहिती अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका स्नेहल केतन खोरे दिली.
याबाबत बोलताना खोरे यांनी सांगितले की, आपल्या लहान मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शालेय पोषण आहार सुविधा मिळावी, विद्यार्थ्यांची आरोग्य सुधारणा व्हावी, पाल्यांना विविध शासकीय सुविधा मिळाव्यात म्हणून अंगणवाडी महत्वाची भूमिका बजावत असते. गेल्या काही वर्षांपासून थत्ते मैदान, पूर्णवाद नगर, मुळा प्रवरा रोड, लबडे वस्ती परिसरात अंगणवाडी नसल्याने पालकांना चिमुरड्यांची नाव नोंदणी परिसरापासून दीड ते दोन किमी लांब असलेल्या सरस्वती कॉलनी, मोरगे वस्ती येथील अंगणवाडीत करावी लागत होती. मागील शैक्षणिक वर्षी ही व्यथा काही जागरूक नागरिकांनी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर केतन खोरे यांनी तब्बल वर्षभर अंगणवाडी प्रकल्प प्रमुख सुधीर पाटील यांचेकडे याबाबत पाठपुरावा केला. चालू शैक्षणिक वर्षापासून म्हसोबा चौक, पूर्णवाद नगर येथे अंगणवाडी सुरू होत असल्याची माहिती नगरसेविका सौ.स्नेहल खोरे यांनी दिली. प्रभागातील नागरिकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी अंगणवाडी सेविका सौ.गायकवाड यांचेकडे करावी. याबाबत कोणतीही समस्या आल्यास आपणास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केले आहे.