साईकिरण टाइम्स ब्युरो 10 जुलै 2020
शिरसगाव (वार्ताहर )गुरुवारी ( दि.9) कोरोनाच्या आढावा बैठकीसाठी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ सकाळी संगमनेर येथे आले, असता शासकीय विश्रामगृह येथे इपीएस ९५ पेन्शनर्स कल्याणकारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाषराव पोखरकर यांचे नेतृत्वाखाली पेन्शनर शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने केरळ राज्याच्या धरतीवर राज्यातील सर्व इपीएस अल्प पेन्शनधारकांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत समाविष्ट करून त्यांना दरमहा रु २०००/- पेन्शन द्यावी व सर्वाना राज्य शासनाकडून मोफत धान्य योजना लागू करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. चर्चेमध्ये पोखरकर यांनी मंत्री महोदयायांना ८ मार्च रोजी अहमदनगर विश्रामगृह येथे समक्ष झालेल्या चर्चेची आठवण दिली.व अल्प पेन्शन घेवून हालाखीचे जीवन जगणाऱ्या या जेष्ठ नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली.
यावेळी शिष्टमंडळात संगमनेर तालुका अध्यक्ष अशोकराव देशमुख,सचिव यशवंत वर्पे,आदी पेंशनर सहभागी झाले होते.मंत्री महोदयांनी या मागण्यांचा शासन निश्चित विचार करेल व तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.