साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020
अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबिन उत्पादक शेतकर्यांना बोगस बियाणे मिळाल्यामुळे सोयाबिनची उगवण झाली नव्हती. त्याअनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना बोगस बियाणे पुरवणार्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी दि.१० जुलै रोजी कृषी आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले व आयुक्त सुहास दिवसे यांनी आंदोलनकर्ते प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी,आझाद फाउंडेशनचे सागर कुंभार यांच्याशी सविस्तर चर्चा केली .यावेळी कृषी आयुक्त कार्यालयाकडून लेखी पत्र देण्यात आले की,नगर जिल्ह्यात ५१९ बोगस बियाणे उगवणीच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तालुका तक्रार निवारण समितीमार्फत ३९८ तक्रारींची पाहणी करण्यात आली.तसेच राज्यात एकूण ५३,९२९ तक्रारी प्राप्त झाल्या असून ३४,८४५ तक्रारींची तालुका समितीमार्फत पाहणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत १४५५ शेतकर्यांना संबंधित कंपन्यांकडून भरपाई मिळवून दिलेली असून उर्वरित पात्र शेतकर्यांनाही लवकरच नुकसान भरपाई देण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिलेले आहे.तसेच राज्यातील २३ बियाणे कंपन्यांवर विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत.
यावेळी चर्चा करतांना प्रधान कृषी सचिव एकनाथ डौले म्हणाले कि,राज्य मंत्री मंडळाच्या २५ जूनच्या बैठकीतील निर्देशानुसार सदोष बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करुन संबंधित कंपनीकडून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांकडून बियाणांच्या दर्जाबाबत शेतकर्यांनी तक्रार करुनही दखल न घेणार्या कंपन्यांचा परवाना रद्द करण्यासाठी तपासून नियमानुसार आवश्यक कारवाई करणार आहोत.
याप्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख,प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी,आझाद फाउंडेशनचे सागर कुंभार आदिंसह नेवासा तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
लाॅकडाऊनच्या काळातही नगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता थेट रेड झोन असलेल्या पुण्यात आयुक्त कार्यालयातच आक्रमक आंदोलन करुन शेतकर्यांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवरुन सोडवणारे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे नगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.