साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 जुलै 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन या संघटनेच्या एकूण कार्यपद्धती बद्दल शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला असून श्रीरामपूर बंदच्या निमित्ताने ही दुफळी समोर आली आहे.
मर्चंट असोसिएशन ही शहरातील व्यापाऱ्यांची एकमेव संघटना असून अनेक मोठ्या व नामवंत व्यापार्यांनी या संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे. अलीकडच्या काळात मात्र ती एका विशिष्ट गटाची संघटना झाल्याची चर्चा शहरांमध्ये होत आहे.
संघटनेचे सभासद अवघे पाचशेच्या आसपास असून शहरातील व्यापाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ही संख्या फक्त दहा टक्के आहे. त्यातून निवडून जाणारे सदस्य हे सर्व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. कोरोनाच्या निमित्ताने शहरांमध्ये लॉक डाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना व्यापारी संघटनेने बाजारपेठ चार दिवस बंद करण्याचे आवाहन केले.
यानिमित्ताने व्यापा-यांमधील असंतोष उफाळून आला. अशोक उपाध्ये व इतर व्यापाऱ्यांनी या बंदला कडाडून विरोध केला एवढेच नव्हे तर बाजारपेठेत फिरून त्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सामील होऊ नका असे आवाहन केले.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सुद्धा बंदला विरोध केला. तर कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बंद पाळण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले काही व्यापाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. मात्र बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवून या बंदला विरोध दर्शवला.
यानिमित्ताने मर्चंट असोसिएशन विरोधात शहरातील व्यापाऱ्यांमध्ये असलेला असंतोष समोर आला. शहरांमध्ये लहान मोठे पाच ते सहा हजार व्यापारी आहेत. भाजीवाल्या पासून तर छोटे-मोठे किराणा दुकानदार, धान्य विक्रेते, स्टेशनरी वाले,कापड व्यवसायिक, भांडी विक्रेते, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते, जनरल स्टोअर्स अशा विविध प्रकारचे व्यापारी पेठेत असताना व्यापारी असोसिएशन मध्ये मात्र ठराविक गटाचे लोकच पदाधिकारी म्हणून व संचालक म्हणून कार्य करतात. लहान व्यापाऱ्यांकडे ही संघटना कधीही लक्ष देत नाही. छोट्या व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला कधीच वाचा फोडली जात नाही. अशा प्रकारची भावना शहरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रबळ झाली असून कालच्या बंदच्या निमित्ताने शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी अशोक उपाध्ये यांना प्रत्यक्ष भेटून, फोन करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरातील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना सामावून घेणारी सर्वसमावेशक अशी श्रीरामपुर व्यापारी महासंघ नावाची संघटना स्थापन करावी अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नजिकच्या काळामध्ये शहरांमधील सर्व व्यापारी वर्गाशी विचारविनिमय करून नवीन व्यापारी संघटना निर्माण करण्याचे सूतोवाच उपाध्ये यांनी दिले असून बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबतची नियमावली व आराखडा तयार केला जाणार आहे.
असोसिएशनचे सभासदत्व मिळविण्यासाठी फार मोठी रक्कम मोजावी लागते. एवढ्या मोठ्या रकमेची गरज काय असा प्रश्न असून सर्व सामान्य व्यापाऱ्यांना सभासदत्व का दिले जात नाही ? त्यामागील कारणे कोणती याचीही चर्चा व्यापारी वर्गात होत आहे.
श्रीरामपूर बंदच्या निमित्ताने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये असलेला एकंदरीत असंतोष समोर आल्याने नवीन व्यापारी महासंघ तयार होणार हे आता निश्चित झाले आहे.